नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील उद्योजकांच्या हितासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे २५ आणि २६ एप्रिलरोजी निमा कार्यालय संकुलात आयोजित नाविन्यपूर्ण आणि राज्यातील पहिले निमा स्टार्टअप समिट उद्योग क्षेत्रात क्रांती घडविणारे तसेच २५० हून अधिक स्टार्टअप तसेच शंभरहून अधिक महिला उद्योजिकांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.
निमा स्टार्टअप समिटच्या प्रदर्शन स्थळाचे भूमिपूजन धनंजय बेळे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच कोषध्यक्ष राजेंद्र वडनेरे यांच्या हस्ते रीतसर विधिवत पूजा करून झाले त्यावेळी मार्गदर्शन करतांना बेळे बोलत होते. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा)तर्फे आतापर्यंत उद्योजकांच्या हितासाठी निमा पॉवर,निमा बँक समिट, B2B , निमा इंडेक्ससारखे उपक्रम राबवून संपूर्ण राज्याचे लक्ष निमाने वेधून घेतले आहे. वर्षभरापासून सुरू झालेल्या निमा स्टार्टअप हबच्या माध्यमातून निमाने गेल्या वर्षापासून नवीन,महिला व सद्यस्थित उद्योजकांना नोंदणी,इतर प्रक्रिया तसेच वित्तीय सहाय्य अशा विविध स्तरावर मार्गदर्शन करण्याचे काम सुरू केले आहे.त्याला मिळत असलेला उदंड प्रतिसाद,महिला सक्षमीकरण अंतर्गत विविध कार्यशाळा घेऊन महिला उद्योजकांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामसुद्धा जोमाने सुरू असल्याची आठवणही बेळे यांनी करून दिली. स्टार्टअपसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती व मार्गदर्शन या समिटमध्ये उपलब्ध होणार आहे.
ज्या स्टार्टअप्सनी उत्पादकीय मॉडेल बनविले त्यांच्यासाठी समिटमध्ये प्रदर्शनीय दालन उपलब्ध होणार आहे.त्यामुळे त्यांच्यादृष्टीने हे समिट जणू एक प्रकारे पर्वणीच ठरणार आहे.वित्त साहाय्यासाठी राज्याबाहेरील 200हून अधिक गुंतवणूकदारांनाही पाचारण करण्यात येणार आहे. समिटमध्ये दोन दिवसांत विविध चर्चासत्रांद्वारे स्टार्टअप,उद्योग उभारणी,पेटंट नोंदणी,बँकां व शासनाच्या विविध योजनांची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही बेळे यांनी स्पष्ट केले.
स्टार्टअप समिटच्या जगात भूमिपूजनाच्या वेळी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार,राजेंद्र अहिरे,सचिव निखिल पांचाळ, विरल ठक्कर राजेंद्र कोठावदे, मूलभूत सुविधा समिती चेअरमन कैलास पाटील, स्टार्ट अप समितीचे चेअरमन श्रीकांत पाटील,किरण खाबिया,मनीष रावल,सतीश कोठारी,योगेश पाटील,रावसाहेब रकिबे, मयुरी राठोड, नितीन आव्हाड आदी उपस्थित होते.