जगदीश देवरे
विश्वविजेत्या बुध्दीबळ खेळाडूसोबत खेळण्याची संधी कुणाला मिळेल हे कॅन्डीडेटस् स्पर्धा ठरवित असते. ज्याच्याकडे विश्वविजेतेपदाचा मुकूट आहे त्याच्याकडून तो जिंकून घ्यायचा असेल आणि विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरायचे असेल तर आंतरराष्ट्रीय बुध्दीबळात खेळाडूंना कॅन्डीडेटस् नावाची अग्नीपरीक्षा पार करावीच लागते. जो जिंकेल तो चॅलेंज देणारा चॅलेंजर ठरतो आणि गत चॅम्पीअन सोबत खेळून नवा विश्वविजेता होण्यासाठी पात्र ठरतो.
सध्या टोरॉन्टोतल्या (कॅनडा) द ग्रेट हॉल मध्ये ही डबल राउंड रॉबीन स्पर्धा सुरू आहे. १६ एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत १० फे-या पुर्ण झाल्या आहेत. एकूण १४ फे-यांच्या या स्पर्धेतून एक विजेता, अर्थात चॅलेंजर निश्चीत होईल आणि त्याला चीनचा विश्वविजेता खेळाडू डिंग लिरेन याच्यासोबत दोन हात करण्याची संधी मिळेल. कॅन्डीडेटस् स्पर्धेचा पॅटर्न असा आहे की इथे फक्त आणि फक्त विजेता होण्यातच अर्थ असतो, उपविजेता….. तिसरा क्रमांक…. हे फक्त सोपस्कार ठरतात.
या स्पर्धेच्या पुरूष विभागात एकूण ८ स्पर्धक सहभागी झालेले असून त्यातले ३ खेळाडू भारताचे असल्याने भारतासाठी ही महत्वाची स्पर्धा आहे. डी.गुकेश, रमेशबाबु प्रज्ञानंद आणि विदीत गुजराथी या ३ भारतीय बुध्दीबळपटूंनी १० व्या फेरीअखेरपर्यंत आपआपले आव्हान जिवंत ठेवलेले असून आता उरलेल्या ४ फे-यात काय उलटफेर बघायला मिळतो यावर बरेच काही अवंलबून असणार आहे. एक तरी भारतीय खेळाडू ही स्पर्धा जिंकून इतिहास घडवणार का ? आणि विश्वनाथन आनंद यांच्यानंतर पुन्हा एक नवा चॅम्पीअन भारताला लाभणार का ? या प्रश्नांची उत्तरे आता जवळ येवू लागली आहेत. या तिनही भारतीय खेळाडूंची स्पर्धेतली सद्यस्थिती अशी आहे –
डी. गुकेश
तामिळनाडूच्या चेन्नईतला हा १७ वर्षीय खेळाडू हा भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. विश्वनाथन आनंदच्या शहरातून पुढे आलेल्या तरुण गुकेशची बाजु स्पर्धेत एकदमच मजबुत आहे. पहिल्या १० फेरीत अवघा १ पराभव, ३ विजय आणि ६ सामने अनिर्णीत सोडवण्यात यशस्वी ठरल्याने त्याच्या खात्यात सध्या ६.५ गुण आहेत आणि त्यामुळे आज तो इयान नेपोम्नियाचची या रशियन खेळाडू सोबत संयुक्त प्रथम स्थानावर आहे. त्याच्यासाठी उरलेल्या ४ सामन्यात गुणतालिकेत तळाला असलेल्या निजात अबासोव्ह, अलिरेझा फिरौझा, आणि फॅबिआनो करूआना यांच्यासोबत लढती असल्याने हे ३ सामने जर गुकेशने खिशात घातले तर डी.गुकेशला विजेतेपदापासून कुणीच रोखू शकणार नाही आणि भारतासाठी तो एक सर्वात आनंदाचा क्षण असेल.
रमेशबाबु प्रज्ञानंद
हा देखील तामिळनाडूच्या चेन्नईतला हा १८ वर्षीय खेळाडू. विजेतेपदासाठी फेव्हरीट समजला जाणारा. सध्या ५.५ गुणांसह गुणतालिकेत क्रमांक २ वर आहे. डी.गुकेशकडून मिळालेला एकमेव पराभव वगळता तो अपराजित राहीला आहे. २ विजय आणि ७ सामने अनिर्णीत ही एक बोलकी आकडेवारी त्याच्या नावासमोर आहे. प्रज्ञानंद कुठल्याही क्षणी उसळी घेवू शकतो ही ख्याती असल्याने आता तो प्रतिक्षा संपवून उरलेल्या ४ डावांचे सोने करून शकतो का हे पहाणे मजेदार ठरणार आहे. इयान, नाकामुरा, कारुआना आणि निजात अबसोव्ह हे उरलेले चार सामने त्याच्यासाठी अगदीच सोप्पे नाहीत. इयान पहिल्या स्थानावर आणि नाकामुरा प्रज्ञानंद सोबतच दुस-या स्थानावर असल्याने आता उर्वरीत स्पर्धेमध्ये प्रज्ञानंदला स्वतःचे सर्व कसब पणाला लावावे लागेल.
विदीत गुजराथी
२९ वर्षीय आणि भारताचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. नाशिकच्या विदीत गुजराथीच्या या स्पर्धेतील कामगिरीसंदर्भात बोलायचे झाल्यास डी. गुकेश आणि प्रज्ञानंद या दोन भारतीय खेळाडूंकडूनच विदीतला पराभव स्विकारावे लागल्याने तो पिछाडीवर पडला आहे. ३ विजय, ३ पराभव आणि ४ अनिर्णीत यामुळे विदितच्या नावापुढे १० डावात अवघे ५ गुण जमा झालेले असले तरी नाकामुरावर मिळवलेल्या दोन विजयानंतर विदीतकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या स्पर्धेतल्या ३ सामन्यात झालेल्या पराभवामुळे तो पिछाडीवर पडलेला असला तरी ही शर्यत अद्यापही त्याच्यासाठी टप्यात आहे. त्यासाठी उर्वरीत आव्हाने विदीत कशी पार करतो, यावर बरेच काही अवलंबून रहाणार आहे. त्याला अजून इयान सोबत एक डाव खेळायचाय, ज्याच्याविरुध्द त्याला पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली होती. परंतु आता अलिरेझा फिरौझा, करुआना आणि निजात अॅबसोव्ह या तीन लढतीत विदितला जर अनुभव पणाला लावता आला तर हे तीन विजय त्याला पुन्हा नवी भरारी देतील. आता त्याच्यासाठी एखाद्या सामन्यातला ड्रॉ हा पराभवासारखाच ठरणार आहे कारण प्रतिस्पर्धी फार पुढे निघून गेले आहेत आणि त्यांना गाठायचे असेल या प्रत्येक सामन्यातून विजयाचा एक गुण त्याला खेचावाच लागेल.
या तिनही भारतीयांनी कॅन्डीडेटस् स्पर्धेचा दबाव अतिशय उत्तम हाताळला आहे. थोड्या बहुत फरकाने कुणीतरी मागे पुढे राहीलही, परंतु, बुध्दीबळातली महाशक्ती म्हणून भारताची जगाला ओळख करून देणारे एक व्यासपीठ म्हणून या वर्षीच्या कॅन्डीडेटस् कडे इतिहासात नेहमीच पाहिले जाईल हे निश्चीत.