नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक वादातून महिलेस बदनामीची धमकी देत एकाने खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. हात उसनवार दिलेल्या पैश्यांची मागणी केल्याने परिचीत असलेल्या संशयिताने हे कृत्य केले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण उर्फ बाळू तानाजी आहिरे (रा.शिंपी गल्ली,चांदवड जि.नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत तवलीफाटा भागात राहणा-या ४९ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत. संशयिताने २०२२ मध्ये महिलेकडून हात उसनवार पैसे घेतले असून या पैश्यांची मागणी केल्याने हा प्रकार घडला.
पैश्यांची परत फेड न करता संशयिताने महिलेशी संपर्क साधत पून्हा अधिकच्या पैश्यांची मागणी केली. यावेळी त्याने पैसे दिले नाही तर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.