इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कल्याण लोकसभा मतदार संघात उमेदवार निश्चित झाला असला तरी ठाणे लोकसभा मतदार संघात कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत उत्सुकता असतांना आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव समोर आले आहे. त्यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांनी आपल्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत याची माहिती मिळावी यासाठी वसई – विरार, मीरा भाईंदर कार्यक्षेत्राच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले असून त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरु केली आहे.
ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना टफ फायट देण्यासाठी शिंदे यांनी आपल्या होम ग्राऊंडवर सरनाईक यांना पसंती दिली आहे. प्रताप सरनाईक हे १९९७ साली राजकारणात आले. १९९७ साली ठाणे महानगरपालिकेत ते विजयी झाले. त्यानंतर ते दोनदा नगरसेवक झाले. २००८ साली त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. त्यानंतर २००९ मध्ये ठाण्यातील ओवळा माजीवाड मतदार संघातून ते आमदार झाले. याच मतदार संघात २००९, २०१४,२०१९ साली ते विधानसभेत निवडून गेले. कथित एनएससीएल घोटाळ्या प्रकरणी त्यांची ईडीने संपत्ती जप्त केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड आहे. या होमग्राऊंडवर ठाकरे गटाला शह देण्यासाठी दमदार उमेदवार असावा यासाठी शिंदे गटाने आमदार प्रताप सरनाईक यांना पसंती दिली. आता या मतदार संघात दोन वेळा खासदार राहिलेले राजन विचार यांच्याबरोबर सरनाईक यांचा सामना होणार आहे.