इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकीकडे काहिली, दुसरीकडे जलधारा असल्याचे चित्र मंगळवारी होते. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. राज्यात भुसावळला सर्वाधिक ४३.८ अंश कमाल तर किमान २७.२ अंश तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नंदुरबारला ४२.८, धुळ्याला ४२ तर जळगावात ४१.५ अंश तापमान होते. एकीकडे तापमानातील पारा वरच्या स्तरावर असताना दुसरीकडे काही ठिकाणी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत सांताक्रूज केंद्रात सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले तर ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
छत्रपती संभाजीनगर (४०.५), अकोला (४१.७), बीड (४२.१), सोलापूर (४१.७) मालेगावसह (४२.६) १९ शहरांमध्ये तापमानाने चाळिशी पार केली आहे. विदर्भ ते कर्नाटकपर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झाल्याने राज्यातील वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. आगामी दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहरे. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर या दहा जिल्ह्यांत तापमानात वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अवकाळी पावसाने काही ठिकाणी काही काळ थोडा थंडावा मिळाला असला तरी दुस-या दिवशी मात्र तापमानात वाढ झाली आहे.