इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगलीः एकीकडे काँग्रेसमधील बंड थोपवण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिका-यांसह जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे जोरदार प्रयत्न सुरु असतांना. थोरांताचे भाचे आ. सत्यजीत तांबे यांनी मात्र विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे नमूद करून त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एकाचवेळी मामा भाच्याची भूमिका वेगवेगळी आहे.
विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने विशाल पाटलांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले. पण, आ. तांबे यांनी आपल्या एक्स हँडलवर विशाल पाटील यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये सत्यजीत यांनी विशाल पाटील यांची बाजू मांडताना म्हटले आहे, की विशाल पाटलांवर काय अन्याय झाला, हे फक्त त्यांचा संघर्ष माहीत असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले, याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत, या मताचा मी आहे. वसंतदादा पाटलांचे महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत. त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत. विशाल हे वसंतदादांचा कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाणआरे आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीय विशालदादांना संधी मिळायलाच हवी, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या अडचणी वाढल्या
आ. तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी पक्षाच्या आदेशाविरोधात जात अपक्ष उमेदवार अर्ज भरला होता. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत आ. तांबे निवडून आले. आता आ. तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहे.