इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कल्याणमध्ये स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटात असणारा वाद मिटला असल्याचे बोलले जात असताना भाजप आमदाराच्या पत्नीचा खा. संजय राऊत व कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबतचा फोटो प्रकाशित झाल्यानंतर शिंदे गटात खळबळ निर्माण झाली आहे.
मलंगगड परिसरातील एका गावात मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला खासदार संजय राऊत उपस्थित होते. या वेळी निघालेल्या स्वागत यात्रेत जीपमध्ये खासदार संजय राऊत, ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह भाजप आमदाराच्या पत्नी सुलभा गायकवाड दिसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
या चर्चेनंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांनी स्पष्टीकरण दिले. मी तिथे प्रचाराला गेले नव्हते. गावदेवी मंदिराची प्रतिष्ठापणा होती त्या निमित्ताने तिकडे गेले होते. मी भाजप सोबत आहे. मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या भूमिकेसोबत मी असेन. मी महायुतीचा प्रचार करणार आहे.