अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे. शेवगाव येथील भाजपचे पदाधिकारी सुनील रामचंद्र रासने यांनी आपल्या विविध पदांचा राजीनामा देणारे पत्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना पाठवले आहे. त्यात विखे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर विखे पाटील यांनी शेवगावच्या नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. येथील नागरिकांशी त्यांचा संवाद नाही, असा आरोप रासने यांनी केला आहे. रासने भाजपचे सरचिटणीस असून त्यांनी शहर उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
गेल्या पाच वर्षात खा. विखे पाटील यांनी मतदारसंघात ढुंकूनही पाहिले नाही. नागरिकांचे फोन न उचलणे, पक्ष म्हणजेच मी आणि मी म्हणजेच मतदार संघातील जनता, असा समज त्यांनी करून घेतला आहे. त्यामुळेच डाळ आणि साखर वाटण्याचे काम त्यांनी केले. मतदारांशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती, अशी खोचक टीका रासने यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष हा देशामध्ये चारशे पार पार करेल; परंतु त्यामध्ये नगर दक्षिणची जागा असणार नाही, याचे दुःख मतदार संघातील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असल्याचे रासने यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
नगर दक्षिण मतदारसंघातील भाजपच्या हजारो निष्ठावंतांची हीच भावना असून मी केवळ प्रतिनिधीक स्वरूपात ती मांडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.