नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25 करिता सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त भाव मिळावा यासाठी सरकारने विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ केली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये 425 रुपये प्रति क्विंटल, तर पांढरी मोहरी आणि काळ्या मोहरीसाठी 200 रुपये प्रति क्विंटल दराने वाढ मंजूर करण्यात आली आहे. गहू आणि करडईसाठी प्रत्येकी 150 रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे. बार्ली आणि हरभऱ्यासाठी अनुक्रमे 115 रुपये प्रति क्विंटल आणि 105 रुपये प्रति क्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे.
सर्वसमावेशक उत्पादन खर्चाचा संदर्भ विचारात घेऊन, कामगारांची मजुरी, बैल किंवा यंत्राद्वारे केलेल्या आणि इतर कामांची मजुरी, भाडेतत्वावर घेलेल्या जमिनीचे भाडे तसेच बियाणे, खते, सेंद्रिय खते, सिंचन शुल्क यासारख्या सामग्रीच्या वापरावर झालेला खर्च, शेतीची अवजारे आणि शेत बांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच इत्यादींसाठी झालेला डिझेल/वीज इ.इंधनाचा खर्च, इतर किरकोळ खर्च आणि कौटुंबिक मजुरीचे मूल्य यांचा या सर्व खर्चामध्ये समावेश आहे.
विपणन हंगाम 2024-25 साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी एमएसपीमधील वाढ देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट इतकी निश्चित करण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणेनुसार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या सरासरी उत्पादन खर्चावर अपेक्षित सर्वात जास्त 102 टक्के भाव गव्हासाठी मिळणार असून त्या खालोखाल पांढरी- काळी मोहरी या पिकांसाठी 98 टक्के, मसुरला 89 टक्के, हरभऱ्याला 60 टक्के, बार्लीला 60 टक्के तर करडईला 52 टक्के अधिक भाव मिळणार आहे. रब्बी पिकांच्या या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतील आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळेल.
अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सरकार तेलबिया, कडधान्ये आणि श्री अन्न/भरड धान्यांच्या पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देत आहे. किंमत धोरणाव्यतिरिक्त, सरकारने आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या तसेच शेतकऱ्यांना तेलबिया आणि कडधान्ये लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी दर्जेदार बियाणे पुरवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान , प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि राष्ट्रीय तेलबिया आणि पाम तेल अभियान यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
त्याचबरोबर, किसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ देशभरातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, सरकारने किसान रिन पोर्टल (KRP), केसीसी घर घर अभियान, आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांबाबत वेळेवर योग्य निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी वेळेवर आणि अचूक हवामान माहिती प्रदान करण्यासाठी हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्टिम (WINDS) सुरू केले आहेत. कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणे, आर्थिक समावेशकता वाढवणे, डेटाचा योग्य वापर करणे आणि देशभरातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.