मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी चार वाजता राज्यातील ५११ ग्रामपंचातींमध्ये ऑनलाइन उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.
कौशल्य विकास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या संकल्पनेनुसार ५११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.
रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये, त्या दृष्टीने कौशल्य विकास केंद्रांची संकल्पना महत्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने कौशल्य विकास, उद्योग यांच्याबरोबरच महसूल, ग्रामविकास यांच्यासह महिला व बालविकास विभागांचा यामध्ये सहभाग असणार आहे. लोकप्रतिनिधींसह आशा व अंगणवाडी सेविका आदीं या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात सहभागी होणार आहेत. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अन्य घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.