चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या वाटेवर आहे. त्यामुळे जातीवर नाही तर विकासावर मत द्या असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज चंद्रपुर जिल्ह्यातील मुल, पोंभुर्णा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, डॉ.भूषण कर्डिले, ईश्वर बाळबुधे, हरीश शर्मा, प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, अल्काताई आत्राम, आशिष देवतळे,प्रा.दिवाकर गमे,जगदीश जुनगरी, नामदेव डावले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महायुती सरकारने मोदी आवास योजनेअंतर्गत १२ हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देत ओबीसी बांधवांना घरे उपलब्ध करून दिली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आज देश आणि आपल राज्य प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, चंद्रपुरात प्रचाराला येऊ नका असे निरोप मला आले. समोरचा उमेदवार ओबीसी आहे असे मला सांगितले. पण मला सांगायचंय ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर चंद्रपूर लोकसभा महाविकास आघाडी उमेदवार असलेल्या आमदार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. ओबीसिंच आरक्षण ज्यावेळी धोक्यात आल, त्यावेळी महायुती सरकारने ठाम भूमिका घेत ओबीसी आरक्षण वाचवून मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिलं. ज्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला त्यावेळी ओबीसींची घर जाळली गेली हल्ले केले गेले. पोलिसांवर हल्ले झाले. त्यावेळी धानोरकर यांच्यासह काँग्रेस पक्षाने कुठलीही भूमिका घेतली नाही. ओबीसींच्या पाठीशी उभे राहिले नाही. झालेल्या प्रकरणाचा निषेध देखील त्यांनी व्यक्त केला नसल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहे. ओबीसींसह सर्वांच्याच हितासाठी त्यांचा पुढाकार आहे. त्यामुळे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपल्याला नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा देशात आणायचे आहे. त्यासाठी कुठल्याही जातीचा विचार न करता विकासाला बघून मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.