येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवल्यातील प्रियंका सुरेश मोहिते हिने नुकत्याच झालेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन केले असून देश पातळीवर असलेल्या रँकिंगमध्ये ५९५ नंबर मिळवला आहे. येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात माध्यमिक शिक्षक असलेल्या सुरेश सुकदेव मोहिते यांची प्रियंका ही मुलगी असून युपीएससीच्या दुसऱ्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे.
पहिली ते पाचवी पर्यंत स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्राथमिक विभागात प्रियंकाने शिक्षण घेतले, त्यानंतर खेडगाव येथे जवाहर नवोदय विद्यालयात तिची परीक्षेद्वारे निवड झाली सहावी ते बारावीपर्यंत नवोदय विद्यालय येथेच तिचे शिक्षण झाले. बारावीला तिचे सायन्स होते. मात्र
यूपीएससी परीक्षा पास होणे हे ध्येय असल्याने प्रियंकाने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले, तेथे राज्यशास्त्र या विषयात बीए करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एमए केले. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात तिला तयारी नसल्याने यश आले नव्हते मात्र दुसऱ्याच प्रयत्नात तिने पहिल्यांदाच मुलाखतीपर्यंत जाऊन बाजी मारली. प्रियंका ही सेट नेट परीक्षा उत्तीर्ण असून तिला ज्युनिअर रिसर्च फेलोशिप ही मिळालेली आहे
प्रियंकाची मोठी बहीण एमबीबीएस असून ती तालुक्यातील सावरगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर भाऊ रोशन हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर असून त्याची सुद्धा यूपीएससीची तयारी चालू आहे. वडील गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक असून स्वामी मुक्तानंद विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे.
प्रियंका मोहिते हिचे मूळ गाव मालेगाव मधील पोहाने हे आहे, पोलीस दलातील नोकरीच्या निमित्ताने तिचे आजोबा सुकदेव मोहिते हे येवल्यात पोलीस दलात नोकरीला होते, वडील सुरेश मोहिते हे सुद्धा येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले .
जिल्हयातील चार मुलांनी यश मिळवले
यावेळेस UPSC परिक्षते जिल्हयातील चार मुलांनी यश मिळवल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक येथील राका प्रिंटर्सचे चालक प्रशांत राका यांचे चिरंजीव उत्सव राका याने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तो देशात २७० व्या क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे. त्याने तिस-या प्रयत्नात हे य़श मिळवले आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील विनय सुनील पाटील हा ११३ क्रमाकं घेऊन उत्तीर्ण झाला. तर निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक असलेले विजयकुमार डेरले यांचे सुपुत्र आविष्कार डेरले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात ६०४ व्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला. येवल्यातून प्रियंका हिने UPSC परिक्षेत य़श मिळवले आहे.