नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पोलीसांनी बेकायदा शस्त्र बाळगणा-यांना आपल्या रडारवर घेतले असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ही कारवाई करण्यात येत आहे. वेगवेगळया भागातून चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संशयितांच्या ताब्यातून चाकू, सुरा आणि कोयत्यासारखे धारदार शस्त्रहस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी भद्रकाली,नाशिकरोड व म्हसरूळ पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोलीस गुन्हेगारांवर लक्ष ठेवून असतांना रोहन मायकल भंडारे (२१ रा.बेथलेनगर शरणपूररोड) हा धारदार सुरा बाळगतांना मिळून आला. शालिमार येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळा भागात मुसक्या आवळत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे घातर सुरा मिळून आला. याबाबत अंमलदार निलेश विखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक निंबाळकर करीत आहेत.
दुसरी कारवाई जेलरोड येथील कलानगर भागात करण्यात आली. कलानगर येथील ड्रीम मिनी मार्केट भागात उभ्या असलेल्या तरूणाकडे कोयता असल्याची माहिती नाशिकरोड पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१५) पथकाने धाव घेत विक्की अनिल कनोजे (३९ रा.जाचक मळा,जयभवानीरोड) याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात घारदार लोखंडी कोयता मिळून आला. याबाबत शिपाई गोकुळ कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.
तिसरी कारवाई दिंडोरीरोड भागात करण्यात आली. धारदार कोयत्यांच्या धाक दाखवून दोन तरूण दहशत माजवित असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकास मिळाली होती. पथकाने सोमवारी (दि.१५) सायंकाळी धाव घेत म्हसरूळ भाजी मार्केट भागात धनराज गोकुळ लांडे (२४ रा.विश्वेश्वर अपा.साई मंदिराजवळ मखमलाबाद लिंकरोड) व हर्षल राजू मोंढे (२० रा.म्हसरूळ भाजी मार्केट समोर ) या तरूणांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन लोखंडी कोयते,एक चाकू असे प्राणघातक शस्त्रे मिळूनआले. या कारवाईत दुचाकीसह शस्त्रे हस्तगत करण्यात आले असून याबाबत हवालदार रमेश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.