नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोमवारी शहरातील वेगवेगळया भागात पोलिसांनी छापे टाकून पोलीसांनी नऊ जुगारींवर कारवाई केल्यामुळे जुगार खेळणा-यांचे धाबे दणाणले आहे. या संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी सातपूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई शरणपूर रोड भागातील मिशनमळा येथे करण्यात आली. या कारवाईत राहूल राजेश गायकवाड,संतोष अर्जुन नलावडे,अनिल बाबुराव वाघ व अर्जुन मनोहर गायकवाड (रा. सर्व लक्ष्मणनगर,पेठरोड) आदी जुगारींना बेड्या ठोकण्यात आल्या. मिशनमळा भागात काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सरकारवाडा पोलीसांनी धाव घेत छापा टाकला असता संशयित टाईम क्लोज व मिलन ओपन तसेच कल्याण ओपन नावाचा मटका जुगार खेळतांना मिळून आले. संशयिताच्या ताब्यातून पाच हजार रूपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याबाबत पोलीस नाईक नितीन थेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.
दुसरी कारवाई औद्योगीक वसाहतीतील प्रबुध्दनगर भागात केली. येथे उघड्यावर काही जुगार खेळत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळच्या सुमारास पथकाने हॉटेल नंदिनी परिसरात छापा टाकला असता कैलास नारायण शेळके, सुरेश बन्शी दबाले (रा. दोघे संत रोहिदास चौक प्रबुध्दनगर), विनोद नायबराव मानकर (रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,प्रबुध्दनगर),वाल्मिक श्रावण घनवासी (रा.गुरूदत्त चौक,प्रबुध्दनगर) व ज्ञानेश्वर पांडूरंग वाटोरे (रा.पिंपळचौक,प्रबुध्दनगर) आदी एका झाडाखाली उघड्यावर पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ४ हजार ५६० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी युनिटचे अंमलदार मते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.