नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चुंचाळे शिवारात बाथरूममधील भरलेल्या पाण्याच्या बादलीत पडल्याने दीड वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अलतमष शफीउल्ला अंन्सारी (रा.मारूती मंदिरासमोर,फरगळे दवाखान्यासमोर संजिवनगर) असे मृत मुलीचे नाव आहे. अन्सारी कुटुंबिय सोमवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरकामात व्यस्त असतांना ही दुर्घटना घडली. अलतमष ही चिमुरडी नेहमी प्रमाणे खेळत असतांना अचानक बाथरूममध्ये गेली होती. अर्धवट भरलेल्या बादलीतील पाण्याबरोबर खेळत असतांना बादलीत पडली.
बराच वेळ उलटूनही तिचा आवाज न आल्याने पालकांनी शोधा शोध केली असता ती बादलीत खाली डोके वरती पाय असलेल्या अवस्थेत आढळून आली. वडिल सफीउल्ला मुजाहीद अली अन्सारी यांनी तातडीने तिला जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.