मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाली तर चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.
विशेष म्हणजे ही दरवाढ सुट्टीच्या काळात राहणार आहे. या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढणार आहे.
ही हंगामी तिकीट दरवाढ असणार आहे. म्हणजेच, तिकीट दर वाढ केवळ एप्रिल ते १५ जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार, असे सांगण्यात आले आहे. तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे.