इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारची महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे कटक व भुवनेश्वर येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी ईश्वरी सावकार महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर भावना गवळी यांची महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली आहे.
सलामीवीर ईश्वरी सावकारची मागील हंगामात १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत ईश्वरीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. ईश्वरी सावकारची चॅलेंजर ट्रॉफी साठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झालेली होती. तसेच सुरत येथे झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राज्यस्तरीय महिला ५० षटकांच्या स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे सलामीवीर म्हणुन खेळताना ईश्वरी सावकारने फलंदाजीचे जोरदार प्रदर्शन केले होते .
ईश्वरी सावकारच्या नेतृत्वाखाली खेळत बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्राला उपान्त्य फेरी गाठण्यात मोठा वाटा उचलला. या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील महिला एकदिवसीय सामन्यांच्या डेहराडून येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेत घणाघाती दिडशतक झळकवत अफलातून फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. नाशिकच्या महिला क्रिकेटपटूने प्रथमच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला स्पर्धेत कर्णधारपद भूषवत असे शतकच नव्हे तर दिडशतक झळकवत ऐतिहासिक कामगिरी केली होती.
भावना गवळी मागील दोन वर्षी सुध्हा महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकपदी होत्या. महाराष्ट्राच्या माजी क्रिकेटपटु भावना गवळी, गेल्या पंधरा वर्षांपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिकच्या महिला क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत आहेत. त्या रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल मध्ये ही क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करतात. १९९१ ते १९९९ दरम्यान त्यांनी महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघाबरोबरच, पश्चिम विभागाचे ही प्रतिनिधित्व केले होते. ऑल इंडिया इंडियन युनिवर्सिटी पातळीवर ही त्या क्रिकेट खेळल्या आहेत.
बीसीसीआयच्या वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्र संघाचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी दिल्ली संघाबरोबर होणार आहे. महाराष्ट्राचे बाकी सामने पुढीलप्रमाणे होणार आहेत : २० ऑक्टोबर – बडोदा , २२ ऑक्टोबर – मिजोराम , २४ ऑक्टोबर – विदर्भ व २६ ऑक्टोबर – मुंबई व २८ ऑक्टोबर – गुजरात.
ईश्वरी सावकार व भावना गवळी यांच्या ह्या महत्वपूर्ण निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व संघात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दोघींचे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.