देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा प्रश्नावर आवाज न उठविणा-या लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये, असा फलक नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी येथील ग्रामस्थांनी लावला आहे. नाशिकच्या कसमादे पट्ट्यात शेतकरी कांदा प्रश्नावरुन आजही आक्रमक आहे. त्यामुळे माळवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेत हा फलक लावला. या फलकामध्ये तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार असे म्हटले आहे.
सत्ताधारी व विरोधकांनी कांदा प्रश्नावर मुग गिळून बसले असल्याने कोणीही मत मागायला येऊ नये अशा आशयाचे फलक लावले आहे. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक भुर्दंड सोसत आहे. त्यामुळे संतप्त गावक-यांनी अशा आशयाचे फलक लावत घोषणा देत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच गावाने कांद्याला दर मिळत नसल्याने गाव विकायला काढले होते आणि त्याची माध्यमांमधून मोठी चर्चा झाली होती.