इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
आज चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा १४९ धावांनी जबरदस्त पराभव केला. मागच्याच सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केलेला असल्यामुळे या सामन्यात न्यूझीलंडने सावधगिरी बाळगत कुठलीही चूक होऊ दिली नाही आणि मग या एकतर्फी झालेल्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे न्युझीलंड विजय ठरले.
या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड विरुद्धच्या मोठ्या विजयामुळे आत्मविश्वास वाढल्यानंतर आपण विजयासाठी दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करू शकतो अशी कर्णधाराला अपेक्षा असावी. परंतु, चिवट न्यूझीलंड संघाविरुद्ध अफगाणिस्तानची व्युहरचना कमीच पडली.
विल यंग, टॉम लॅथम, आणि ग्लेन फिलिप्स यांनी उत्कृष्ट फलंदाजी न्यूझीलंडची धावसंख्या २८८ पर्यंत पोहोचली. या संपूर्ण डावात फक्त एक क्षण असा आला होता की त्या वेळेला अफगान संघ न्यूझीलंडला डोईजड ठरतो की काय? असे वाटायला लागले होते. १०९ या धावसंख्येवर रचिन रवींद्रच्या स्वरूपात अफगाणिस्तानला दुसरी विकेट मिळाली आणि त्यानंतर ११० या धावसंख्येवर विल यंग आणि डेरिंल मिचेल असे दोन खेळाडू लागोपाठ तंबूत परतले. परंतु या भूकंपानंतर ४ बाद ११० वरून ग्लेन फिलिप्सने आपली विकेट सांभाळून डाव पुढे नेला. आज अफगाणिस्तानच्या फिरकीची जादू चाललीच नाही. रशीद खानला १० षटकात ४३ धावा देऊन १ बळी मिळाला. नवीन उल-हक आणि आझमतुल्ला उमरझाई या दोघांना २-२ बळी मिळाले.
उत्तरादाखल फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवातीलाच पडझड झाली. इंग्लंड विरुद्ध विजयी खेळी करणाऱ्या रहमानऊल्ला गुरबाजला आज न्यूझीलंडने स्वस्तात परत पाठवले. त्यानंतर फक्त रहमत शहा आणि आजमतुल्ला उमरझायी यांनाच काय ती थोडीफार चांगली धावसंख्या उभारता आली. नंतर मात्र कुणाचाच खेळपट्टीवर टिकाव लागला नाही. ट्रेंट बोल्ट, मिशेल सॕन्टनर आणि लाॕकी फर्ग्युसन या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानचे विजयाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. आता न्यूझीलंड संघ ४ सामन्यात ४ विजयासह गुणतालिकेत टॉपवर असून त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो.
भारताचा गुरुवारी बांग्लादेश विरुद्ध सामना
उद्या पुण्यातील गहुंजे इथल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारताचा बांग्लादेश विरुद्ध सामना रंगणार आहे. या स्पर्धेत भारताने जरी ऑस्ट्रेलिया पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाचा पराभव केलेला असला तरी त्यांना उद्याच्या सामन्यात बांग्लादेश संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही. काही मुख्य स्पर्धांमध्ये बांग्लादेशने नेहमीच भारताविरुद्ध अतिशय चांगली कामगिरी केली असून, अगदी मागच्या ५ सामन्यांचा जरी उदाहरणादाखल या ठिकाणी उल्लेख केला तरी त्या ५ पैकी ३ सामने बांग्लादेशने जिंकून स्वतःचा दबदबा निर्माण केलेला आहे.