निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुक्यातील चांदोरी येथे पुरातन श्रीराम मंदिर असून येथे गेली ४०० वर्ष अनोखा राम जन्मोत्सव साजरा होतो. हे मंदिर १६१३ साली स्थापन झालेले असून हे दक्षिण मुखी श्रीराम मंदिर आहे. येथील जन्मोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा होतो.
गुढी पाडव्याला रामाची गुढी म्हणजेच ब्रम्हध्वजा उभारून राम उत्सवाची सुरुवात होते. हा गावातील श्रीराम आपला आहे या भावनेने बारा बलुतेदार आपापल्या जबाबदाऱ्या स्वतःहून पार पाडत असतात, रामाचा पालखी सोहळा बुधवार १७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता सुरू होणार आहे. ही पालखी गावातील सगळे लोक आपल्या खांद्यावर घेऊन परिसरात मिरवतात. त्या दरम्यान त्या पालखीतील प्रासादिक मूर्तीलां स्पर्श करण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडते, पालखीच्या ११ प्रदक्षिणा पूर्ण झाल्या नंतर श्रीराम मूर्ती स्थानापन्न होतात. नंतर नाभिक समाजाची व्यक्ती सूर्याचे किरण श्रीरामाच्या मुखावर चमकावतात आणि मग श्रीराम जन्म झाला अशी येथील अनोखी प्रथा आहे. हे बघण्यासाठी लांबून लोक या पालखी सोहळ्यास येतात.
श्रीराम नवमी निमित्त रात्री ९ वाजता नाशिक मधील सुप्रसिद्ध युवा गायक ऋषिकेश रिकामे यांचा भक्तिधारा हा भावगीत आणि भक्तीगीतांचा कार्यक्रम श्रीराम मंदिरात होणार आहे. अशी माहिती श्रीराम मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त श्रीकांत मटकरी आणि अजय मटकरी यांनी दिली.