नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एज्युकेशन कन्सेप्ट्स ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले, यामध्ये इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडाची वाडी या शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी दिपाली सोमनाथ दराने हिने प्रथम क्रमांक मिळवला त्याचबरोबर जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळा देवळा येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी स्वरित रवींद्र वरखेडे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळवला. जिल्हा परिषद शाळा खेरवाडी ता. निफाड येथील इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी पूजा सोमनाथ भुरके या विद्यार्थिनीला फास्टेस्ट स्पेलिंग बी या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंचोली येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी सई सुभाष आमले या विद्यार्थिनीला उत्कृष्ट स्पेलिंग उच्चाराबाबत विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने गतवर्षापासून जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, या स्पर्धेत शाळास्तर, केंद्रस्तर, तालुकास्तर व तालुका स्तरावरून जिल्हास्तरावर स्पर्धा स्पेलिंग बी स्पर्धा ही घेतली जाते त्यामुळे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची प्रत्येक स्तरावर तयारी करून घेण्यात येते. यामुळेच राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली. राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.