इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतांना रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये मंत्री नारायण राणे यांनी भाजपतर्फे तर किरण सामंत यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २४ एप्रिलला कोकणात प्रचाराला येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
या जागेवर उमेदवारी निश्चित होण्याअगोदर मंत्री राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानंतर शिंदे गटाचे उमेदवार सामंत यांनी रविवारी नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अर्ज घेतला. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला याची चर्चा आता सुरु झाली आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग व सातारा लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवाराला अगदी कमी वेळ प्रचारासाठी मिळणार आहे.
महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम व मुंबई उत्तर दक्षिण या नऊ जागांवर अद्याप एकमत झाले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही जागांवर अद्याप चर्चा सुरू असल्याचे मान्य केले आहे. तीन-चार जागांवर अद्याप चर्चा सुरू असून चर्चा करून तोडगा काढण्याचे त्यांनी सांगितले होते. फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. पण, या जागेवर उमेदवार कोण हे अद्याप समोर आलेले नाही.