सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने थेट ठाकरे गटाच्या उमदेवाराला विरोध करत बंडाचे निशाण फडकवले आहे. तर दुसरीडे दुसरीकडे भाजपचे जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. मंगळवारी विशाल पाटील हे अपक्ष उमेदवारी भरणार असून त्यामुळे सांगलीत राजकीय हालचालीला वेग आला आहे.
राजीनामा दिल्यानंतर जगताप म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये मी आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केले. पंरतु पक्षाने त्याची दखल न घेता अलिकडे माझ्याविरोधात गट बांधण्याचे तसेच माझे अवमुल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आले. ते मला सहन करणे शक्य नसल्याने मी राजीनामा दिला आहे.
काँग्रेससारखी भाजपची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही
चार दिवसापूर्वी प्रचाराच्या एका बैठकीत सांगतील भाजपच्या माजी आमदाराने पक्षालाच खडेबोल सुनावले असून त्याची चर्चाही चांगलीच रंगली होती. या नेत्याने थेट काँग्रेससारखी भाजपची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही असे सांगत घरचा आहेर दिला आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पलूस येथे आयोजित बैठकीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी हा इशारा दिला होता. त्यावेळेस ते म्हणाले की, लोकसभेसाठी मी उमेदवारीची मागणी केली होती. उमेदवारी द्यायची नव्हती, तर आम्हाला बोलवून तसे सांगायला हवे होते. उमेदवारी न देण्याचे कारण सांगायला हवे होते. आम्हाला काहीच अडचण नव्हती. पक्षावर आमचा राग नाही. पण विश्वासात घेऊन काम नाही केले नाही, तर काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.