नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -वाहन पार्क करीत असतांना बाजूला सरका असे सांगितल्याने दांम्पत्याने घरात घुसून चालक व त्याच्या पत्नीस मारहाण केल्याची घटना जेलरोड भागात घडली. या घटनेत वाहन चालकाच्या पत्नीचा विनयभंग करण्यात आला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद केदारे व प्रियंका केदारे (रा.दोघे पिंटो कॉलनी,जेलरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दांम्पत्याचे नाव आहे. संशयित दांम्पत्य व वाहनचालक एकाच सोसायटीतील रहिवासी असून, गेल्या २४ जून रोजी रात्री ही घटना घडली. पीडितेचा पती सोसायटीच्या पार्किंगमध्ये आपले वाहन पार्क करीत असतांना सदर दांम्पत्य अन्य सदस्यांसमवेत गप्पा मारत होते.
यावेळी चालकाने केदारे दांम्पत्यास बाजूला व्हा असा सल्ला दिल्याने ही हाणामारी झाली. संतप्त दांम्पत्याने पीडितेच्या घरात घुसून पती पत्नीस शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. यावेळी केदारे याने पीडितेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.