इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः राज्यातील बहुतांश जागा महायुतीने जाहीर केल्या असल्या तरी काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. त्यात मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा सर्वात चर्चेची आहे. या मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. आज मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे त्यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. विमानतळावर पाटील यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करत हमारा खासदार कैसा हो, विनोद पाटील जैसा हो’ च्या घोषणा दिल्या.
शिंदे आज बुलडाणा येथून मुंबईकडे रवाना होताना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर थांबले होते. त्या वेळी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
संभाजीनगरमधून मंत्री संदीपान भुमरे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे नाव चर्चेत आहे; परंतु छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे, की छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार निश्चित झाला आहे; परंतु घोषणा बाकी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भेट झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जागेसंदर्भात नाव कळेल, असे त्यांनी सांगितले होते.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधून विनोद पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.