इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुली व एका मुलाला विहिरीत फेकून त्यांची हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता जालन्यात उघडकीस आली. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. शुभम संतोष ताकवाले (वय १४), अमृता संतोष ताकवाले (वय १२), शिवानी संतोष ताकवाले (वय ९) अशी या तीन भावडांची नावे आहेत. वडिलांनीच या तिघा भावंडांना विहिरीत ढकलून मारल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही.
संशयिताने या घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर तो मुंबईला पळून जात असताना त्याला संभाजीनगरात पोलिसांनी रात्री ११ वाजता अटक केली. संतोष ताकवाले हा डोमगावचा आहे. या गावाजवळच असलेल्या झोडेगाव शिवारात ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढून अंबड येथील रुग्णालयात आणले. मुलांचा पित्याने का खून केला, हे समजू शकले नाही. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
या घटनेनंतर संशयित पसार झाला होता. पोलिस पथक त्याच्या मागावर होते. संभाजीनगरातील जालना रस्त्यावरील बाबा पेट्रोल पंपपरिसरातून त्याला ताब्यात घेतले. तो मुंबईला जाण्याच्या बेतात होता. या घटनेत आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत.
अशी उघड झाली घटना
दरम्यान संतोष ताकवले हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसापूर्वी तो त्याच्या तीन मुलांसह अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे आला होता. त्याने गावातील विलास आसाराम सोळुंके यांच्या शेतातील विहिरीमध्ये तिन्ही मुलांना फेकत हत्या केली. मृतदेह रविवारी पाण्यात तरंगत असल्याने ही घटना उघडकीस आली.