इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : खा. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
खा राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे, की चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्रात सुरू आहे. त्या खेळाचे सूत्रधार आहेत मिंधे सरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल करूनही धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत.
धर्मदाय आयुक्त या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी ॲड. नितीन सातपुते यांनी करून एक महिना झाला, तरी या तक्रारीची दखल घेतली जात नाही. माहितीच्या अधिकारातही ही माहिती दिली जात नसल्याचे खा. राऊत यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोट्यवधी रुपये देणारे दानशूर कोण?
श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर आतापर्यंत झालेल्या खर्चाच्या निधीचा स्रोत काय, असा सवाल त्यांनी केला आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यासाठी कोट्यवधी रुपये देणारे दानशूर कोण? असा सवाल ही माहिती नागरिकांना मिळाला पाहिजे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.