इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकलूज येथे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रविवारी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे बारामती, माढा व सोलापूर येथील राजकीय गणित बदलली असून महायुतीला हा मोठा धक्का बसला आहे. मोहिते पाटील यांची सोलापूर जिल्हयात ताकद आहेच. पण, त्यांचा फायदा बारामती व सातारा लोकसभा मतदार संघात सुध्दा होणार आहे. त्यामुळे हा प्रवेश सोहळा महायुतीला महागात पडला आहे.
माढा लोकसभा मतदार संघातील विद्यमान खा. रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारीवरुन सुरु झालेला हा वाद तीन मतदार संघात पडसाद उमटले हे महायुतीला सुरुवातीला जाणवले नाही पण, आता त्याचा हादरे बसू लागल्यामुळे महायुतीने या मतदार संघात आता लक्ष केंद्रीत केले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार व सुशील कुमार शिंदे रविवारी अगोदर अकलूज मध्ये एकत्र आले. त्याच ठिकाणी या तीन मतदार संघातील गणितही बदलले.
जयंत पाटील यांनी घोषित केली उमेदवारी
रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा निवडणुकांसाठी दहावे उमेदवार त्यांच्या रूपाने जाहीर केले. आपले नाव घोषित करताना फक्त मलाच नाही तर अकलूज, माळशिरस आणि माढ्यातील जनतेला प्रचंड आनंद झाला आहे. या संपूर्ण सोहळ्यातून महाराष्ट्राला एक संदेश दिला. राज्यात परिवर्तन होणार आणि त्याची सुरुवात विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून होते आहे हे अधिक समाधानकारक आहे.
विजय दादा म्हणजे जुनं सोनं आहे. या सोन्याची किंमत दुर्दैवाने त्यांना कळली नाही. त्याला जातिवंत सोनार लागतो आणि ते म्हणजे शरदचंद्र पवार साहेब आहेत. दादांसोबत विधिमंडळात मला काम करता आले. कृष्णा – भीमा स्थिरीकरणाचा पुढाकार दादांचाच होता. विजय दादांनी हातात घेतलेली विकासाची पतका आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी हाती घेतली आहे. त्यांना तुमच्या विश्वासाची गरज आहे.
ज्या अर्थी पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे, त्या अर्थी त्यांची बेरीज जुळत नाही. तरी आता ४०० पार करण्याची त्यांची स्वप्ने आहे. त्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलण्याचा त्यांचा मानस आहे. हा मानस मोडून काढण्याची ताकद तुम्हा सर्वांमध्ये आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजणार हा मला विश्वास आहे.