नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजपकडून विरोधीपक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येतात. नंतर मोदी ते भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये आणतात, मग अमित शाह त्यांना वॉशिंगमशीनमध्ये टाकतात आणि नितीन गडकरी त्या भ्रष्टाचाऱ्यांना बाहेर काढतात. यांच्या लॉन्ड्रीमधून निघालेला भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नेता हा पूर्णपणे स्वच्छ होतो. अशाच प्रकारे २३ मोठ्या नेत्यांना याच मोठ्या लाँड्रीमधून स्वच्छ केले असून आता त्या नेत्यांवर कुठलेही आरोप नाही, ना त्यांची चौकशी सुरु आहे. हा भाजपचा दुट्प्पीपणा सर्वांना कळला असून आता संधी दिली जाणार नसल्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीयध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.
रविवारी गोळीबार चौक येथे इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. विकास ठाकरे हे “हायफाय” नसून काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. देशात सुरु असलेली ही लढाई मोदी किंवा गडकरी यांच्याशी नसून ही मनुवादी विचारधारेविरुद्धची लढाई आहे. या मनुवादी विचारधारे विरुद्ध लढणाऱ्या विकास ठाकरे नागपूर लोकसभा जिंकत असल्याचा विश्वासही यावेळी खर्गे यांनी व्यक्त केला.
प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. सतिश चतुर्वेदी, माजी मंत्री अनिस अहमद, अतुल कोटेचा, अतुल लोंढे, बंटी शेळके, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांची उपस्थिती होती.