इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूरः राज्यात कोण कोणत्या पक्षात आहे याचा गोंधळ असतांना लोकसभा निवडणुकीत आता नेते पक्ष बदलत आहे. आज करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. नारायण पाटील यांच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने करमाळा तालुक्यातून मोहिते पाटलांना बळ मिळणार आहे.
नारायण पाटील २६ तारखेला करमाळा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या वेळी त्यांच्या गटाचे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य तुतारी हाती आहेत. पाटील म्हणाले, की मी गेली दहा वर्षे मोहिते पाटील यांच्यासोबत आहे. या वेळी लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत राहणार आहे.
करमाळ्यात संजय शिंदे अपक्ष आमदार असले, तरी त्यांची अजित पवारांशी जवळीक आहे. त्यांचे बंधू बबन शिंदे माढयाचे आमदार आहेत. त्यामुळे नारायण पाटील यांना शरद पवार गटात प्रवेश केल्याने त्यांचा करमाळ्यातील विधानसभेचे तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.