नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवीरल कलानगर येथील गुरुमाऊली बंगला येथे पोलिसांनी छापा टाकून ६ लाख ६० हजार ६० रुपयाचा प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. हा साठा अवैधपणे साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. पोलीस आल्याची चाहुल लागताच संशयित भास्कर गरड हा पळून गेला.
या बंगल्याची पंचासमक्ष घरझडती घेतली असता त्यात वेगवेगळया रंगाचे प्लॅस्टीक गोण्या व खाकी रंगाचे बॉक्स दिसून आले. त्यांची पहाणी करता त्यात विमल पान मसाला, मिराज किर, काकील टोबॅको, वाह पानमसाला, व्ही-१ टोबॅको, डब्ल्यु चॅव्यींग टोबॅको असे प्रतिबंधीत असलेला एकुण ६,६०,०६० रुपये किंमतीचा पानमसाला व तंबाखू मिळून आला. या छाप्यानंतर भास्कर गरड याचे विरूध्द पोहवा देवराम चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरचा माल कोठून आणला व त्याची विक्री कोठे होणार होती याबाबत तपास चालु आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नितिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि सुभाष ढवळे, पोउपनि डी. वाय. पटारे, पोउपनि यु.एम.हाके, पोहवा देवराम चव्हाण, बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वालझाडे, पोअ पंकज चव्हाण, पंकज महाले, गिरिधर भुसारे, जितु शिंदे यांनी केलेली आहे.