शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिर्डी येथे श्री.साईबाबा मंदीरात होणाऱ्या रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने वाहनांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी श्री.साईबाबा मंदीर परिसर ‘नो पॉकिंग झोन (वाहन विरहित क्षेत्र)’ जाहीर करण्यात आला आहे. मंदीराकडे जाणाऱ्या पाच मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. १६ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपासून ते १८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, (१) श्री साईबाबा मंदिर चावडीचे पुर्वेकडील कॉर्नर ते राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी म.सा चौक – गुरुस्थान चौक व साईबाबा मंदिरगेट नंबर ०४ पर्यंतचा पालखी मार्ग (२) श्री साईबाबा मंदिर गेट नं. ०४ ते गंगवाल दुकान इमारत पर्यंतचा पालखी मार्ग. (३) श्री साईबाबा मंदिर गेट नं. ०४ ते साई तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र पर्यंतचा मार्ग. (४) श्री साईबाबा मंदिर पुर्व बाजुकडील श्री साईबाबा चावडी ते श्री साईबाबा मंदिर गेट नं. ०३ ते जुना पिंपळवाडी रोड पावेतो (साईउद्यान पर्यंतचा मार्ग) (५) जुना पिंपळवाडी रोड (श्री साईबाबा मंदिर गेट क्रमांक ०१ ते साई उद्यान साईश कॉर्नर पर्यंतचा मार्ग या रस्त्यावर येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक स्थळ असून श्री. साईबाबांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, परराज्य व बाहेरील देशातून भाविकांची व त्यांच्या वाहनांची प्रचंड गदी होत असते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी रामनवमी उत्सव २०२४ साठी मोठ्या प्रमाणात भाविक श्री.साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत. अहमदनगर – मनमाड हा महामार्ग शिर्डी शहरातून जात असल्याने गर्दीच्या कालावधीत भाविकांची व जनतेची गैरसोय होवू नये तसेच भाविकांची सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने श्री. साईबाबा मंदिर परिसरात वाहन विरहीत क्षेत्र (नो पार्कंग झोन) घोषित करण्यात आला आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.ओला यांनी आदेशात नमूद केले आहे.