नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वेची मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) सदैव सज्ज असते. प्रवाशांना सुरक्षित, निर्भय आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी दल चोवीस तास कार्यरत असते. याशिवाय भारतीय रेल्वेला एक सुरक्षित वाहतूक सेवा प्रदान करण्यासाठी हे दल सहाय्य करते. आरपीएफने नेहमीच प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय करून आणि रेल्वेच्या मालमत्तेशी झालेल्या गुन्ह्यांचा वेळोवेळी छडा लावण्याचा प्रयत्न करून देशभरात विखुरलेल्या रेल्वेच्या प्रचंड मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी नेहमीच अगदी चोखपणे पार पाडली आहे.
‘नन्हे फरीश्ते’ अंतर्गत लहान मुलांची सुटका:
विविध कारणांमुळे आपल्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या/हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडण्यामध्ये आरपीएफ महत्वाची भूमिका बजावते. या अनुषंगाने भारतीय रेल्वेने ‘नन्हे फारीश्ते’ ही मोहीम सुरु केली आणि या मोहिमे अंतर्गत, सप्टेंबर-२०२३ मध्ये भारतीय रेल्वेच्या संपर्कात आलेल्या काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या ८९५ पेक्षा जास्त मुलांची (मुलगे-५७३ आणि मुली-३२२) सुटका करण्यात आली, आणि त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये परत पाठवण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
मानवी तस्करी आणि ऑपरेशन आहट (AAHT):
मानवी तस्करांच्या कुटील कारस्थानांचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यासाठी, आरपीएफची मानवी तस्करी विरोधी पथके भारतीय रेल्वेमध्ये पोस्ट स्तरावर (ठाणे स्तरावर) कार्यरत आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये मानवी तस्करांच्या तावडीतून २९ जणांची सुटका करण्यात आली, आणि १३ मानवी तस्करांना अटक करण्यात आली.
ऑपरेशन ‘जीवन रक्षा’:
ऑपरेशन ‘जीवन रक्षा’ अंतर्गत सप्टेंबर २०२३ मध्ये रेल्वे मार्ग आणि फलाटावरील २६५ प्रवाशांचे प्राण आरपीएफ पथकांची सतर्कता आणि त्यांनी केलेल्या त्वरीत कारवाईमुळे वाचले.
महिलांची सुरक्षितता:
भारतीय रेल्वे महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. या संदर्भात, “मेरी सहेली” हा उपक्रम लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिला प्रवाशांना, विशेषत: एकट्याने प्रवास करणाऱ्या किंवा असुरक्षित महिला प्रवाशांना गुन्हेगारीपासून संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत, २३१ मेरी सहेली पथकांनी १३०७१ रेल्वे गाड्यांमध्ये हजेरी लावली आणि सप्टेंबर २०२३ मध्ये ४२११९८ महिला प्रवाशांना सुरक्षेची हमी दिली. त्याशिवाय, आरपीएफने सप्टेंबर २०२३ मध्ये महिलांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या ६०३३ व्यक्ती विरोधात कारवाई केली.