इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. यावेळी राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ आरपीआय नेते अविनाश महातेकर, नागसेन कांबळे तसेच असंख्य भीम अनुयायी उपस्थित होते.
चैत्यभूमीच्या आवारात प्रदर्शनाला भेट
याप्रसंगी चैत्यभूमीच्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाला भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला आहे. राज्य शासनाने इंदू मिलवर भव्य स्मारक, दीक्षा भूमीचे जतन संवर्धन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घराचे संग्रहालयात रूपांतर करून बाबासाहेबांना खरी मानवंदना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे, राज्यात देखील हा दिवस आपण साजरा करत असल्याचे यावेळी सांगितले.
मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार असे दावे कुणी कितीही करत असले तरीही ते अशक्य आहे असे खुद्द पंतप्रधान मोदीजी यांनीच स्पष्ट केले आहे असेही यावेळी आवर्जून स्पष्ट केले.