नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे स्वाक्षरी, शिक्क्याचे बनावट पत्र तयार केल्यामुळे नाशिकच्या पांजरपोळ व्यवस्थापक व पदाधिकारी विरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाची सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे.
विभागीय आयुक्तालयातील तहसीलदार मीनाक्षी राठोड यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. १२ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयात हा प्रकार घडला. सादर करण्यात आलेले पत्र बनावट असल्याचा संशय आल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने त्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयातून माहिती घेतली असता, तसे पत्र निर्गमित झालेले नसल्याचे कळवण्यात आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्वाक्षरी, शिक्क्याचे बनावट पत्र सादर केल्याप्रकरणी नाशिकच्या पांजरपोळ पदाधिकाऱ्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूसंपादन प्रकरणाच्या सुधारित निवाड्याची सद्यःस्थिती आणि मोबदला मिळवण्यासाठी केलेल्या अर्जासोबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील स्वाक्षरी, शिक्क्याचे बनावट पत्र सादर करून शासनाचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न आणि दिशाभूल करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पांजरपोळ संस्थेचे व्यवस्थापक व पदाधिकारी विरुध्द फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.