नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विविध कारणांमुळे नागपूर लोकसभा निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरत आहे. विविध संघटना भाजपविरोधात एकवटल्या असून राज्यातील भाजप, शिवसेना (एकनाश शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुती सरकारचे घटक असलेल्या बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाने नागपुरात भाजपच्या विरोधात असलेल्या इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना समर्थन जाहीर केले आहे. या संदर्भात प्रहार पक्षाचे नागपूरचे शहर अध्यक्ष अमोल इसपांडे यांच्या सहीने पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ऑटोरिक्षा संघटनाही ठाकरेंच्या पाठीशी
शहरातील विविध संघटनांसह टायगर ऑटोरिक्षा संघटनेनेही इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला आहे. गेल्या दहा वर्षात असंघटीत कामगार तसेच ऑटो रिक्षा चालकांच्या समृद्धीसाठी केंद्र सरकारने एकही उपाय योजना केली नसून सामान्यांच्या आवाज संसदेत पोहोचविण्यासाठी संघटनेने पाठींबा जहीर केला असल्याचे संघटनेचे मार्गदर्शक विलास भालेकर यांनी सांगितले.