इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
१३ एप्रिल १९८४ या दिवशी भारतीय लष्कर आणि भारतीय वायुदल यांनी उत्तर लडाख भागातील उत्तुंग पर्वतराजीमधील सियाचेन ग्लेशिअर (हिमनदी) कडे कूच केले असताना मेघदूत मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमध्ये भारतीय वायुदलावर भारतीय लष्कराच्या जवानांना हवाईमार्गाने हिमनद्यांच्या भागातील शिखरांवर सोडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही मोहीम १९८४ मध्ये सुरु झाली असली तरी, वायुदलाची हेलिकॉप्टर्स १९७८ पासूनच सियाचेन ग्लेशिअरच्या भागात कार्यरत होती. ऑक्टोबर १९७८ मध्ये ग्लेशिअर भागात उतरणारे चेतक हे भारतीय वायुदलाचे पहिले हेलिकॉप्टर होते.
नकाशे नसलेल्या लडाखच्या भागातील सियाचेनमधील परदेशी गिर्यारोहण मोहिमांना अनुमती देत पाकिस्तानने सुरु केलेली नकाशातील फेरफारीच्या प्रयत्नांद्वारे दाखवली जाणारी आक्रमकता १९८४ च्या सुमारास भारतासाठी चिंतेचे कारण ठरू लागली होती. या भागात होऊ घातलेल्या पाकिस्तानी लष्करी कारवाईची माहिती गुप्तचरांकडून मिळताच, सियाचेनवरील दावा कागदोपत्री अधिकृत करून घेण्याचे पाकिस्तानचे कारस्थान उधळून लावण्याचा भारताने निश्चय केला. सियाचेनमधील सामरिक महत्त्वाच्या शिखरांवर लष्करी तुकड्या स्थापित करन ती शिखरे सुरक्षित करण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन मेघदूत’ ही मोहीम सुरू केली. या प्रयत्नांमध्ये भारतीय वायुदलाच्या An-12, An-32 आणि IL-76 या तंत्रकुशल आणि सामरिक लढाऊ विमानांनी अतुलनीय कामगिरी करून सैनिकांची आणि आवश्यक रसदीची हवाई वाहतूक केली. अत्यंत उंचावरील युद्धभूमीवर त्यांनी हे सर्व सुखरूपपणे उतरवले. तेथून Mi-17, Mi-8, चेतक आणि चीताह हेलिकॉप्टर्सनी सैनिक आणि रसद ग्लेशिअरच्या आत्यंतिक उंच क्षेत्रात नेले. हेलिकॉप्टर तयार करणाऱ्या कंपन्यांनी घालून दिलेल्या मर्यादेच्या तुलनेत कितीतरी अधिक उंचीवर जाऊन हे काम केले गेले. लवकरच, सियाचेन ग्लेशिअरच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण शिखरांवर आणि खिंडींमध्ये ३०० पेक्षा अधिक सैनिक तैनात झाले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान लष्कराने त्यांच्या तुकड्या पुढे दामटेपर्यंत भारतीय लष्कराने त्या सामरिक महत्त्वाच्या शिखरांवर आणि खिंडींमध्ये पाय रोवले होते. या चातुर्यामुळे भारताला एक मोठा रणनैतिक फायदा झाला..
एप्रिल १९८४ पासून या भयाण निर्जन हिमप्रदेशात सैन्याचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात भारतीय लष्कराने जी कडवी झुंज दिली, तिला मौल्यवान अशी साथ देताना भारतीय वायुदलाने पराकोटीच्या कमी तापमानात आणि आत्यंतिक उंचीवर केलेली कामगिरी अचंबित करणारी अशीच आहे. आजही ही कामगिरी म्हणजे अविचल मनोधैर्याची आणि अमाप कौशल्याची प्रेरक गाथा आहे. सुरुवातीला ती जबाबदारी केवळ वाहतुकीइतकीच मर्यादित होती, व सैनिकांना आणि रसद साहित्याला वाहून नेण्याचेच काम हेलिकॉप्टर्सना व विमानांना होते, तरी हळूहळू वायुदलाने योगदान वाढवत नेले. दलाने या भागात लढाऊ विमानेही तैनात केली. वायुदलाच्या हंटर विमानाने लेह येथील अत्युच्च हवाई तळावरून लढाऊ कारवायांना सुरुवात केली- सप्टेंबर १९८४ मध्ये स्क्वाड्रन २७ येथून हंटर विमानांच्या ताफ्याने कारवाया सुरु केल्या. पुढील दोन वर्षांत हंटर्सनी लेहहून एकूण ७०० पेक्षा अधिक उड्डाणे करण्याची प्रभावी कामगिरी केली. ग्लेशिअर भागात वाढत्या प्रमाणात लढाऊ विमानांची वर्दळ आणि आक्रमणसदृश कारवाया वाढत गेल्यावर तेथे तैनात भारतीय सैन्यतुकड्यांचे मनोधैर्य उंचावले. इतकेच नव्हे तर, या भागातकोणतेही दुःसाहस न करण्याचा स्पष्ट इशारा शत्रूपर्यंत पोहोचला. पुढे, लेहच्या दक्षिणेला कार त्सो येथील अति उंचावरील गोळीबार क्षेत्रात सशस्त्र कारवाया केल्या गेल्या. लढाऊ विमानांच्या उड्डाणांसाठी जमिनीवरील पायाभूत सुविधा जसजशा बळकट होत गेल्या तसतशी मिग-23 आणि मिग-29 देखील लेह आणि थोइसे येथून झेपावू लागली. २००९ मध्ये भारतीय वायुदलाने ग्लेशिअर भागात चितळ हेलिकॉप्टर्सही तैनात केली. अतिउंचावरील क्षेत्रात भार वाहून नेण्याच्या दृष्टीने चीताह प्रकारच्या हेलिकॉप्टरमध्ये अभियांत्रिकी बदल करून चितळ हेलिकॉप्टर्स तयार करण्यात आली आहेत. २० ऑगस्ट २०१३ या दिवशी भारतीय वायुदलाने आपल्या क्षमतेचे भेदक दर्शन घडवत, नुकतेच खरेदी केलेले लॉकहीड मार्टिन C-130J सुपर हर्क्युलस हे चार इंजिनांचे वाहतूकयोग्य विमान, दौलत बेग ओल्डी या जगातील सर्वोच्च धावपट्टीवर उतरवले. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळच्या टापूत हा भाग येतो. आज जवळपास भारतीय वायुदलाची सर्व विमाने- राफेल, सु-30MKI, चिनूक, अपाचे, हेलिकॉप्टर्स Mk III व Mk IV, हलके लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंड, मिग-29, मिराज-2000, C-17 , C-130 J, IL-76 आणि An-32 ही सर्व- ऑपरेशन मेघदूतचे बळ वाढवतात.
‘पराकोटीची विपरित हवामान स्थिती’ हीच ओळख सांगणाऱ्या जगातील सर्वोच्च रणभूमीवर भारतीय वायुदलाची हेलिकॉप्टर्स म्हणजे भारतीय सैन्यतुकड्यांची जीवनरेखा आणि त्यांना बाहेरच्या जगाशी जोडणारी एकमेव रेषा होत. त्यामुळे चार दशकांपासून सुरु असलेली लष्करी मोहीम सुरु ठेवण्यात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आपत्कालीन परिस्थितीत क्रियाशील प्रतिसाद देणे, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, आजारी आणि जखमी सैनिकांना ७८ किलोमीटर लांबीच्या हिमनदीतून सोडवून आणणे- अशा अनेक जबाबदाऱ्या वायुदलाच्या हेलिकॉप्टर्स तेथे पार पडतात. अशा निर्दयी भौगोलिक प्रदेशात, मानवी सहनशीलता आणि तग धरून राहण्याची वृत्ती, आणि त्याचबरोबर आकाशात झेपावणे, तांत्रिक कौशल्य, आणि अशा कित्येक गोष्टींच्या विक्रमाचा आदर्शच भारतीय वायुदल दररोज प्रस्थापित करत आहे.