इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मोदी सामान्य जनतेसाठी नाही, अदानीसाठी काम करतात. मोदींचा उद्देश्य तुमचे ध्यान भटकवण्याचा आहे आणि अदानीचे काम तुमच्या खिशातले पैसे काढून घेण्याचे असल्याची टीका करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, आज देशात २२ लोक असे आहेत, त्यांच्याकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती देशातील ७० टक्के लोकांकडे आहे.
भंडारा येथे लोकसभेच्या निवडणुकीसाठी झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने जाहिरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहिरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एमएसपीचा कायदा, ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणे, अग्निवीर योजना बंद करणार तसेच हिंदुस्थानातील गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार चंद्रकांत हंडारे, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री सतीष चतुर्वेदी, भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे गडचिरोली चिमूरचे काँग्रेस उमेदवार ड़ॉ. नामदेव किरसन, नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे, चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोकर, यांच्यासह विदर्भातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.