इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर उमेदवारी बाबत अजून निर्णय झालेला नसतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे हे १९ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्यामुळे शिंदे गटात नाराजी वाढली आहे. या जागेवर शिंदे गटाने दावा केला असून त्यामुळे या जागेवर जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले होते. राणे कोणत्याही क्षणी उमेदवारी अर्ज भरू शकतात, हे कळाल्यानंतर शिंदे यांनी याबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते. राणे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यास शिंदे गट काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे किरण सामंत इच्छूक आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाऊ किरण यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आपला दावा केला.