इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई करत एकाच मालकाच्या दोन ठिकाणाहून १ लाख १८ हजाराचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईबाबत या विभागाने दिलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी ९ वाजता संदीप गोविंद मुसळे, मालक मे. शिवम ट्रेडर्स, शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक येथे धाड टाकली असता सदर ठिकाणी रजनीगंधा पानमसाला, जाफराणी जर्दा, विमल पानमसाला, व्ही १ सुगंधित पानमसाला इ. प्रतिबंधित पदार्थाचा २२ हजार ४१४ रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले. कायदयाअंतर्गत तरतुदीनुसार जप्त करून ताब्यात घेतल्यानंतर त्यांचेच मालकीचे मोगलनगर मधील श्री जोगेश्वरी अपार्टमेंटसमोर, मोगल मळा, मोगलनगर, सिडको, नाशिक येथील गोदामाचा तपास केला असता तेथेही रजनीगंधा पानमसाला, जाफराणी जर्दा, विमल पानमसाला, व्ही 1 सदरचा साठा सुगंधित पानमसाला, राजनिवास पानमसाला, रॉयल ७१७ सुगंधित तंबाखु, हिरा पानमसाला इ. प्रतिबंधित पदार्थाचा ९५ हजार ६१६ रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले.
सदरचा एकूण १ लाख १८ हजार ३० रुपये किंमतीचा साठा अन्न सुरक्षा व मानके कायदयाअंतर्गत तरतुदीनुसार जप्त करून ताब्यात घेतला व सदरची दोन्हीही ठिकाणे सिल करण्यात आली आहेत. वरील दोन्ही प्रकरणी संदीप गोविंद मुसळे, मालक, मे. शिवम ट्रेडर्स, शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक यांचेविरुध्द अंबड पोलिस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम ३२८ व अन्न सुरक्षा व मानदे कायदयाअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई सहायक आयुक्त (अन्न) म.मो. सानप व उ. सि. लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अ.3. रासकर व अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) यांच्या पथकाने केली.