नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँग्रेसने कष्टकरी, गरीब, मुस्लीम कुटुंबांना काय दिले? चहाची टपरी, पानठेला, कबाडीचे दुकान दिले. त्यांना ट्रक ड्रायव्हर केले, अशी टीका केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. भाजपने आणि नितीन गडकरी नावाच्या भाजप कार्यकर्त्याने गरीब कुटुंबातील तरुणांना रोजगार दिला. त्यांना दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणले. प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क मिळवून दिला. माझे कॉलेज नाही आणि शाळाही नाही. माझ्या कोट्यातून इंजिनियरिंग कॉलेज मिळाले तर ते मी अंजुमन शिक्षण संस्थेला दिले. तिथे आज हजारो मुस्लीम तरुण-तरुणी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. जाती-धर्माचे राजकारण कधी केले नाही आणि करणारही नाही, असेही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज (शुक्रवार) म्हणाले.
पूर्व नागपुरातील नदंनवन, उत्तर नागपुरातील नारी रोड आणि गरीब नवाज नगर येथे गडकरी यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार कृष्णा खोपडे, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, शिवसेना नेते सुरज गोजे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी नगरसेवक विरेंद्र कुकरेजा यांची उपस्थिती होती. ‘क्रीडा, सांस्कृतिक, रोजगार, पर्यटन, शिक्षण, उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये नागपूरला विकसित करण्यासाठी उपक्रम राबविले. संपूर्ण नागपूर शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. आता नागपूरला स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून लौकिक मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत,’ असे सांगून ते म्हणाले, ‘काँग्रेसचे लोक म्हणतात की प्रचार करायचा नाही तर का फिरताय? ज्या जनतेने मला दोनवेळा निवडून दिले, त्या जनतेचे दर्शन घेण्यासाठी फिरतोय. २०१४ मध्ये, नागपूरची जागा जिंकणे अवघड आहे, असे सांगून मला इतर मतदारसंघांतून लढण्याचा सल्ला देण्यात आला होता.
पण नागपूर माझ्या मनात, ह्रदयात आहे. त्यामुळे नागपूरमधूनच लढण्याचा मी निर्णय घेतला आणि येथील जनतेने माझा विश्वास सार्थ ठरवला.’ ‘नंदनवन बदलले आहे. एकेकाळी पावसाळ्यात नागनदीचे पाणी लोकांच्या घरात शिरायचे. आता ही समस्या राहिलेली नाही,’ याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. नागपुरात शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत नागपूरला ‘एज्युकेशन हब’ करण्याचा निर्धार केला. आज ४९ इंजिनियरिग कॉलेजेस झाली. सिम्बायोसिस आले. नरसी मोनजी ग्रूप लवकरच नागपुरात येणार आहे. एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटी आले. भविष्यात नागपूरच्या तरुणांना बाहेर शिकायला जाण्याची गरज पडणार नाही,’ असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
सिकलसेल, थॅलेसिमियासाठी स्पेशल वार्ड
सिकलसेल आणि थॅलेसिमिया हा अत्यंत गंभीर आजार आहे. उत्तर नागपुरातील हजारो लोक या आजाराने ग्रस्त आहेत. दलित समाजाला या गंभीर आजारापासून मला मुक्त करायचे आहे. त्यासाठी एम्स, मेडिकल आणि मेयोमध्ये सिकलसेल आणि थॅलेसिमियासाठी स्पेशल वार्ड करण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे नितीन गडकरी उत्तर नागपुरात झालेल्या सभेमध्ये म्हणाले.