नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोवा राज्यातून मद्याची तस्करी करणारे पुरवठादार ग्रामीण पोलीसांचे जाळयात अडकले. नाशिक शहरातील मद्य तस्करी करणारा हस्तक फिरोदिया यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचे यापूर्वी हस्तगत केलेले ४४८ बॉक्ससह आणखी ‘२४० बॉक्स’ जप्त एकुण ६६ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक ५ एप्रिल रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या तस्करी करणारे ट्रकवर छापा टाकून ४३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केल्याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे गुरनं ९५/२०२४ भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात एक आरोपीस अटक करण्यात आली होती. त्याचे कब्जातील ट्रकमधून गोवा राज्य निर्मित रॉयल
ब्ल्यु व्हिस्कीचे ४४८ बॉक्स ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. आरोपी पदमसिंग बजाज हा गोवा राज्यातून महासाठा ट्रकमध्ये भरून मुंबई आग्रा महामार्गाने गुजरात राज्यात घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले होते.
सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सदरचे मद्य हे गोवा राज्यातील महेश शेठ व बिलाल यांचे सांगण्यावरून नाशिक येथील फिरोदिया शेठ यांचे मार्फतीने त्यांचे आर्या ट्रान्सपोर्टकडील वाहनातून गुजरात राज्यात राजु शेठ यांचेकडे पाठविण्यात येणार असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.