इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
१५ ऑक्टोबर २०२३ डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा वाचन प्रेरणा दिवस युएई देशात दुबई येथे आयोजित केला गेला. ग्रंथ तुमच्या दारी युएई समिती आणि ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम बुकलेट गाय म्हणजेच अमृत देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक प्रेरित ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचे जनक विनायक रानडे हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये केला गेला पहिले सत्र वाचन वेग कौशल्य याविषयी होते तर दुसरे सत्र ‘ गोष्ट… एका पुस्तक वेड्याची!!’ म्हणजेच अमृत देशमुख यांची मनमोकळेपणाने घेतलेली मुलाखत होती. ग्रंथ तुमच्या दारी युएई समितीच्या बालपेटी आणि तरुणाई पेटी प्रमुख सौ. डॉ.पल्लवी बारटके यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शौनक कुलकर्णी याने ग्रंथ ची ओळख करून दिली. सलोनी पोरवाल हिने अमृत देशमुख यांचा परिचय करून दिला, तर आभा अडके हिने आभार प्रदर्शनाची जबाबदारी पर पाडली. अमृत देशमुख यांनी पहिल्या सत्रात स्पीड रेडींग सोबतच काही स्मरणशक्ती तंत्रदेखील शिकवले, ज्या सर्वांनाच विशेषतः मुलांना खूप आवडले.
दुसऱ्या सत्राचे सूत्र संचालन सौ. मंजुषा जोशी यांनी केले. ग्रंथ तुमच्या दारी युएई समितीच्या या वर्षीच्या मुख्य समन्वयिका सौ. श्वेता पोरवाल आणि श्री.प्रथमेश आडविलकर यांनी अमृतची मुलाखत घेतली. मुलाखतीत विचारलेल्या सर्वच प्रश्नांना अमृतने मोकळेपणाने उत्तर देत अनेक पुस्तकांबद्दल माहिती दिली, ज्याची नोंद अनेक प्रेक्षकांनी घेतली. या कार्यक्रमाचा समारोप श्री. किरण थोरात यांनी केला. हे सत्र देखील स्पीड रीडिंग प्रमाणेच सर्वांना खूप माहितीपूर्ण वाटले. सत्राअखेरीस प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची देखील अमृतने सविस्तर उत्तरे दिली.
ग्रंथ तुमच्या दारी युएई समिती वाचनाचा प्रसार व्हावा यासाठी अनेकविध उपक्रम युएईमध्ये राबत असते. त्यापैकीच एक उपक्रम होता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुस्तक परीक्षण उपक्रम!! या उपक्रमात स्वजोश पोरवाल, दुर्वा कबाडे, पावनी बारटके आणि सलोनी पोरवाल या मुलांनी परीक्षण लिहिली. सौ. विशाखा पंडित यांनी त्यांचं कौतुक करून अमृत यांच्या हस्ते या मुलांना पुस्तकांच्या स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच स्वतःचे ११ पुस्तक परीक्षण आणि स्वतःच्या वाचकांचे दहा पुस्तक परीक्षण या उपक्रमासाठी दिल्याबद्दल सौ. श्वेता पोरवाल यांना विशेष स्मृतिचिन्ह देण्यात आले.
ग्रंथ तुमच्या दारी युएई समितीच्या कार्यक्रमांना नेहमीच उत्साहाने सहकार्य करणारे ग्रंथचे समन्वयक श्री. श्री कुलकर्णी यांना विशेष स्मृतिचिन्ह देण्यात आले. श्री. विनायकजी रानडे नाशिकहून खास कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनाही विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सौ.श्वेता पोरवाल, सौ.विशाखा पंडित, सौ. स्नेहल देशपांडे, संजय देशपांडे, सौ. नीलम नांदेडकर, सौ. प्रचिती तलाठी, श्री वीरभद्र कारेगावकर, श्री किरण थोरात, श्री. प्रथमेश आडविलकर यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. सौ. श्वेता करंदीकर यांनी कार्यक्रमाची सुंदर निमंत्रण पत्रक बनवले तर सौ. प्रज्ञा शिरसाठ यांनी आकर्षक स्मृतिचिन्ह डिझाइन केली. सौ. गौरी देवधर यांनी कार्यक्रमाचे छायाचित्रण केले, तर श्री हरी अग्निहोत्री यांनी चित्रफीत तयार केली.
या कार्यक्रमासाठी श्री. अमोल वैद्य, सौ. मोहना केळकर यांचे GIIS शाळेचा हॉल मिळवून देण्यासाठी सहकार्य लाभले तर अमृत यांची निवास व्यवस्था SMANA हॉटेलचे चेअरमन राजेश बाहेती तसेच श्री प्रसाद दातार यांचे सहाय्य मिळाले कार्यक्रमाच्या आर्थिक नियोजनासाठी Samsotech LLC च्या सौ. वंदना देशपांडे यांची मदत लाभली.एकूणच वाचकांसाठी वाचन प्रेरणा दिवस आखाती देशामध्ये साजरा होणे हा एक स्मरणीय अनुभव ठरला.