नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टाकळीरोडवरील श्रीकृष्णनगर भागात रस्त्याने पायी जाणा-या वृध्देच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजना मधुकर जाधव (६३ रा.श्रीकृष्णनगर,आगरटाकळीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव या मंगळवारी (दि.९) रात्री फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. बेला व्हिस्टा बिल्डींगसमोरून त्या पायी जात असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्याच्या गळय़ातील सुमारे ५० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
कोयता घेऊन फिरणा-या एकावर पोलीसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाथर्डी फाटा परिसरातील नागरे मळा भागात राजरोसपणे कोयता घेऊन फिरणा-या एकावर पोलीसांनी कारवाई केली. संशयिताच्या ताब्यातील लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण नारायण शेळके (२५ रा.म्हाडा वसाहत नागरे मळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नागरे मळ््यातील कृष्णाई हॉटेल भागात उभ्या असलेल्या संशयिताकडे कोयता असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पथकाने धाव घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता मिळून आला. याबाबत अंमलदार प्रकाश नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.