निलेश गौतम, सटाणा
तब्बल २० लाख मतदार दोन जिल्हे आणि सहा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी दोघा पेशाने डॉक्टर असलेल्या माजीमंत्र्यांमध्ये सरळ लढत होणार आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत धुळे लोकसभेचे नेतृत्व करणारे डॉ सुभाष भामरे यांना पक्षाने परत संधी दिल्याने डॉ. भामरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. सुरवातीला भारतीय जनता पक्षा कढून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने या वेळी भाजपाचा उमेदवार कोण? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविलें जात असताना पक्षाने डॉ. सुभाष भामरे यांना महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत उमेदवारी देऊन या विषयाला पूर्णविराम दिला.
तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी पक्ष कोणाला उमेदवारी देतो याबाबत खलबते सुरू असताना धुळे आणि नाशिक जिल्ह्याचा विचार करता धुळ्यातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर तर नाशिक मधून जिल्हाध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांचे नाव अंतिम टप्प्यात चर्चेत असताना ऐनवेळी लोकसभा क्षेत्राबाहेरील असलेल्या व काँग्रेसच्या माजी मंत्री नाशिक स्थित असलेल्या डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
या उमेदवारी मुळे धुळे आणि मालेगाव मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या उमेदवारीला उघड उघड विरोध दर्शविला आहे. एकीकडे डॉ सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला सुरुवातीला पक्षांतर्गत विरोध करणारेचे बंड शमते ना शमते तोवर काँग्रेसच्याही उमेदवाराच्या बाबतीत असे घडल्याने दोघेही उमेदवारांना निवडणूक पूर्वीच स्वकीयांचाच सामना करण्याची वेळ आली आहे.
धुळे लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रापैकी तीन विधानसभा हे नाशिक जिल्ह्यातील तर तीन विधानसभा क्षेत्र हे धुळे जिल्ह्यात आहेत, सहा पैकी बागलाण, शिंदखेडा मध्ये भाजपाचे आमदार आहेत तर धुळे ग्रामीण वर्षानुवर्षे काँग्रेसचा बालेकील्ला राहिला आहे. या विधानसभा क्षेत्राचे आमदार कुणाल पाटील हे गत निवडणुकीत लोकसभेचे उमेदवार होते. मात्र त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी यावेळी निवडणूक लढविण्यास नकार दिला.
मालेगाव मध्य मध्ये एमआयएमचे आमदार आहेत तर मालेगाव बाह्यला महायुती घटक पक्षातील शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे हे प्रतिनिधित्व करतात तर धुळ्यात ही एमआयएमचे आमदार आहे. काँग्रेसने आयात करून दिलेल्या उमेदवाराला स्थानिक पक्ष कार्यकर्ते किती पाठबळ देतात, शेतकरी, आदिवाशी मतदार काँग्रेस उमेदवाराला किती प्रमाणात मदत करतील यावरच डॉ शोभा बच्छाव यांच्या जय पराजयाचे गणित राहणार आहे. आपल्या राज्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात धुळ्याचे पालकमंत्री पद भूषविणाऱ्या डॉ. शोभा बच्छाव यांनी या काळात स्थानिक कार्यकर्त्यांची असलेली फळी टिकवून ठेवली आहे की संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत ते आगामी काळात दिसणार असले तरी, डॉ सुभाष भामरे यांना ही गत १० वर्षातील कामगिरी वर कही खुशी कही गमचे वातावरण आहे. सत्ताधारी पक्षाची शेतकरी विरोधी धोरण ही डॉ. भामरे यांना उमेदवारी काळात अडचण निर्माण करणारे ठरणार असले तरी धुळे लोकसभेचे खासदार ”बाबा” होणार की ”ताई’ हे सांगणे आज तरी अवघड आहे.