नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत लाठ्या काठ्यांसह कोयत्याचा वापर करण्यात आल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जुने नाशिक परिसरातील नानावलीत गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शोएब शेख, नासिर शहा, माया भाई, टम्प्या शेख, वाजिद शहा, आयान शेख तसेच रजा शहा गुड्या शहा, सिराज अहमद राईन व आसिफ फिरोज खान अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक शिवाजी कुलकर्णी यानी फिर्याद दिली आहे. शहरात सर्वत्र रमजान ईद साजरी होत असतांना नानावलीत ही घटना घडली.
संशयित अज्ञात कारणातून प्राणघातक शस्त्रानिशी गैरकायद्याची मंडळी जमवून एकमेकात शिवीगाळ व मारहाण करतांना मिळून आले. या हाणामारीत दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.