इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागावाटपात उत्तर मुंबई लोकसभा जागा काँग्रेसच्या वाट्याला आली असली तरी उमेदवार मिळत नसल्यामुळे काँग्रसेची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांना काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र घोसाळकर यांनी नकार दिला. त्यामुळे या जागेचे करायचे काय असा प्रश्न काँग्रेसला पडला आहे. तर दुसरीकडे मुंबईत ठाकरे गटाला जास्त जागा दिल्यामुळे वर्षा गायकवाड नाराज असून त्या दिल्लीत गेल्या आहे.
घोसाळकर यांनी शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे. काँग्रेसच्या चिन्हावर लढून जिंकण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या जागेवर राम नाईक, गोपाळ शेट्टी निवडणूक जिंकले आहेत. या वेळी पीयूष गोयल रिंगणात आहेत. या अगोदर संजय निरुपम, ऊर्मिला मातोंडकर या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.
दुसरीकडे विरोधकांनी काँग्रेसला मुद्दाम अशी जागा देण्यात आली आहे, की ती जिंकू शकत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार मिळून राजकीय षडयंत्र रचून राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला नष्ट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.