नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचा उमेदवार ठरलेला नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्याबाबत चर्चा होती. पण, आता नवीन उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून शिवसेना शिंदे गटाचे काही नेते हे मुंबई येथे गेल्याचे वृत्त आहे. आज किंवा उद्या उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.
भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी नवीन चेहरा देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन नाशिकचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. विद्यमान खा. हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ या दोन्ही नावांना विरोध होत असल्यामुळे नवीन चेहरा देण्याच्या हालचाली मुंबईत जोरात सुरु झाल्या आहे.
शिंदे गटाकडून अजय बोरस्ते यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेना फुटीनंतर बोरस्ते यांनी २२ नगरसेवक व हजारो शिवसैनिकांसोबत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्याकडे आता जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आहे. अजय बोरस्ते हे भाजपमधून शिवसेनेत आले. त्यानंतर त्यांनी महानगरप्रमुख, महानगरपालिकेचा गटनेता, विरोधी पक्षनेता अशा जबाबदा-या सांभाळल्या आहे. बोरस्ते यांच्याबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार व भाजपकडून काही नवीन नावावर चाचपणी सुरु आहे.