इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माढा लोकसभा मतदार संघात संघर्ष वाढल्यानंतर भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गुरुवारीच शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे.
त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा, संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडल कार्यकारणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्तीकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही पूर्ण करून सक्रीय केल्या. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजीत करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे.
आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेल्या संधी बद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो, व आपणास कळवू इच्छीतो की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे, त्याचा स्विकार व्हावा, ही विनंती.
राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार
धैर्यशील मोहिते पाटील हे दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनीच पत्रकार परिषदेत दिली. त्यांचा प्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही ते म्हणाले. पण, यावेळी त्यांनी कोणतीही अपेक्षा ठेवून ते पक्षात येत नसल्याचे सांगितले.
उमेदवारी निश्चित होणार
महाविकास आघीडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या असून त्यापैकी ९ उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले. पण, माढा लोकसभा मतदार संघातील नाव जाहीर करण्यात आले नाही. आता मोहित पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांचे नाव निश्चित होणार असल्याची शक्यता आहे.
या कारणाने नाराज
भाजपने माढा लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील नाराज आहे. त्यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील व रामराजे नाईक निंबाळकर कुटुंबाचा विरोध असल्यामुळे हा प्रवेश सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.