कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्याची आता शर्यतच लागली आहे. पहिले चंद्रपूरच्या सभेतील वाद शमत नाही तोच आता कोल्हापूरमधील वाद समोर आला आहे. येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचे कोल्हापूरचे उमेदवार, खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. मंडलिक यांनी थेट शाहु महाराजांविषयीच वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी आताचे महाराज खरे वारसदार नाहीत. ते दत्तकपुत्र आहेत, असे सांगितले. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.
खा. मंडलिक चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत ते म्हणाले, की आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते दत्तकच आले आहेत. आपण कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहोत.
मंडलिक यांनी दोन दिवसापूर्वी विरोधकांनी आपला पराभव टाळण्यासाठी छत्रपती शाहू यांना बळीचा बकरा बनवले, अशी टीका केली होती. महाराजांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले असले तरी आम्ही गादीचा सन्मान करतो, असे म्हटले होते. निवडणूक म्हणजे कुस्तीचा आखाडा आहे. त्यात कुणीही छोटा किंवा मोठा नसतो. कुस्तीत डाव टाकावाच लागतो, असे सांगून त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला होता.